SHRI GURUDEO SEWA MANDAL, NAGPUR

Previous slide
Next slide

सर्व भूतहिते रताः
सर्व जीवांच्या कल्याणार्थ व हितार्थ कार्य करणे हेच आमचे प्रथम कर्तव्य आहे.

वंदनीय श्री तुकडोजी महाराजांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील यावली गावात 30 एप्रिल 1909 रोजी झाला. अगदी बाल वयापासूनच त्यांना ईश्वर भक्तीचे वेड होते. सर्वसामान्यांची राष्ट्राप्रती उदासिनता पाहुन त्यांची ईश्वर भक्ती राष्ट्रभक्तीकडे वळली. ग्रामस्थानाच्या विधायक कार्याकडे विशेषत्वाने त्यांनी लक्ष घातले. 1942 च्या चलेजाव आंदोलनात महाराजांची भूमिका राष्ट्र नेत्याची होती. त्यादरम्यान त्यांना कारावास देखील भोगावा लागला.
भारतीय स्वातंत्र्यानंतर गावागावातील अंधश्रद्धा, जाति भेद, धर्मभेद समुळ नष्ट होऊन, गावाच्या उन्नतीसाठी, राज्यात सुराज्य निर्मीतीकरिता ग्रामगीता या ग्रंथाची रचना करुन त्यांनी आदर्श जीवनाचा पाया घातला.
राष्ट्रसंतांनी आपल्या आयुष्याचा क्षणोक्षण राष्ट्रनिर्माणासाठी वेचला. खंजिरी भजन त्यांचे समाज प्रबोधनाचे साधन होते. त्यांचे गद्य पद्य वाङ्मय समाजाला आजही दिशा दाखविण्यास समर्थ आहे.
अध्यात्म आणी विज्ञानची अनोखी सांगड घातल्यामुळे भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी महाराजांना राष्ट्रसंत उपाधीने गौरविले. त्यांनी स्थापन केलेल्या मोझरी येथील गुरुकुंज आश्रमात 11 ऑक्टोंबर 1968 रोजी राष्ट्रसंतांचे महानिर्वाण झाले. वाड्मयीन सेवा व त्यांची समाधी समस्त मानवजातीसाठी प्रेरणास्थानी आहे.

मानवतेचे महान पुजारी राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज सद्गुरूचरणी लीन होऊन जनसेवेसाठी स्वतःला समर्पित करणारे आणि साध्या सरळ शब्दांमध्ये भक्तीची कल्पना मांडणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सामाजिक विषमतेवर प्रहार करून समाजाला सर्वधर्मसमभाव अशी शिकवण देऊन अंधश्रद्धेच्या बेड्या तोडुन, धार्मीक कट्टरतेच्या भिंतीना तडा दिला. तुकडोजी महाराजांनी सामाजिक चेतना जागृत करुन बंधूत्व, प्रेम आणि मानवतेचा संदेश खेडोपाडी जाऊन पसरविला व राष्ट्रभक्तीचा पगडा मनामनात रुजविला.

गौरवांजली

वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचाराने प्रभावीत असलेले मा.नितीनजी गडकरी यांच्याकडे तुकडोजी महाराजांचा विचार देशपातळीवर पोहोचवण्यासाठी प्रयत्न व्हावे याकरीता श्रीगुरूदेव सेवा मंडळ, नागपूर तर्फे विनंती करण्यात आली.

अध्यात्म हे जीवनाचे अभिन्न अंग आहे, अध्यात्म सोबत विज्ञानाची जोड असल्यास जीवन अधिक सुखकर होते. सर्वसामान्यांमधे राष्ट्रधर्म जागृतीसाठी वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांची नितांत गरज आहे.

संवेदनशील व कृतीशील मा.गडकरी साहेबांनी विनंती स्विकारून राष्ट्रसंतांचे तत्वज्ञान व्यापक व्हावे यासाठी अद्ययावत विचारांना समर्पीत असलेली वेब साईटच्या निमीतीसाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

अत्यंत अल्पावधीत आम्हाला वं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची वेब साईट उपलब्ध झाली ज्यामुळे वं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावार पोहचविण्यास मदत होणार आहे. मा.नितीनजी गडकरींजींच्या सहकार्या बद्दल गुरूदेव परिवार सदैव ऋणी राहिल.

- अशोक यावले